जयगड समुद्रात सर्च ऑपरेशन दरम्यान आणखी एक सांगाडा सापडला

रत्नागिरी:- तालुक्यातील जयगड येथे किनार्‍यापासून समुद्रात दोन नॉटीकल मैलात खोल पाण्यामध्ये रुतलेल्या नावेद – 2 या मच्छीमारी नौकेवरील जाळ्यामध्ये अडकून पडलेला एक सांगाडा स्कुबा डार्यव्हर्स्नी बाहेर काढला आहे. सांगाडा कोणाचा आहे, हे शोधण्यासाठी जनुकीय (डीएनए) चाचणी केली जाणार आहे.

पोलिस यंत्रणेकडून शनिवारी (ता. 18) ही शोध मोहीम राबविण्यात आली होती. काही दिवसांपुर्वी जयगड येथील स्थानिक मच्छीमारांनी खाजगीरित्या राबविलेल्या मोहीमेमधून समुद्राच्या तळाशी सुमारे अकरा मीटरहून अधिक खोल पाण्यात नावेद नौका रुतल्याची माहिती पुढे आली होती. मच्छीमारांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिस यंत्रणेकडून आज स्कुबा डायर्व्हस्ना निमंत्रित केले होते. शनिवारी सकाळी 11 वाजता मोहीमेला सुरवात झाली. आरंभी नौदलाच्या पथकाने सोनार यंत्रणेचा वापर करुन समुद्राच्या तळात रुतलेली नावेद नौका कोणत्या ठिकाणी आहे, ती जागा निश्‍चित केली. त्यानंतर तीन स्कुबा डायव्हर्स् विविध साहित्य घेऊन समुद्रात उतरले. खोल पाण्यामध्ये नौका रुतलेल्या ठिकाणी त्यांची पाहणी केली. नौकेच्या वरील बाजूस अडकलेल्या मासेमारी जाळीमध्ये एक सांगाडा आढळून आला. त्याची कवटी आणि हाडे वेगवेगळी झालेली होती. तो सांगाडा स्कुबा डायर्व्हस्नी बाहेर काढून किनार्‍यावर आणला. दोन तासाहून अधिक काळ ही मोहीम सुरु होती. बाहेर काढलेल्या सांगाडा पुढील तपासासाठी खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आला आहे.
नावेद मच्छीमारी नौका बेपत्ता झाली तेव्हा सात खलाशी होते. त्यातील एकाचा मृतदेह सापडला. दुसरा मृतदेह तपासिक यंत्रणेला आढळला होता, मात्र तो बाहेर काढणे शक्य झाले नव्हते. आता नावेदवर एक सांगाडा सापडल्यामुळे तिसर्‍या खलाशाचा शोध लागणार आहे. उर्वरित चार खलाशांचे मृतदेह मिळणे अशक्य झाले आहे. सापडलेला सांगाडा नक्की कोणाचा आहे, याची ओळख पटवण्यासाठी जनुकीय (डीएनए) चाचणी करण्यात येणार आहे. सांगाड्याजवळ असलेल्या कपड्यांवरुन ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहे. जिंदल कंपनीच्या बंदरात माल घेऊन येणार्‍या मोठ्या जहाजाने नावेद नौकेला धडक दिल्याची तक्रार होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता. फतेहगड हे मालवाहू जहाज बंदरात आणण्यासाठी संबंधितांना नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपअधिक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली जयगड पोलिस करत आहेत.

नौकेखालीही सापडू शकतात सांगाडे

नौका चिखलात पूर्णतः रुतलेली असून खालील बाजूस अन्य खलाशांचे सांगाडे असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नौका बाहेर काढण्यासाठी दोन मोठी जहाजे आणि यंत्रसामग्री जाणार आहे. पुढील महिन्यात यासाठी वेगळी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्यामध्ये खलाशाचा सांगाडे सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.