रत्नागिरी:- पर्यटकांना प्रवाशांना आता जयगड ते गुहागर हे अंतर कापणे अधिक सोयीस्कर होणार आहे. कोकणातून महाबळेश्वर पाठोपाठ आता जयगड ते तवसाळ हा समुद्री मार्ग आता केबल स्टेड ब्रिज जोडण्यात येणार आहे. ७१५ कोटी रुपये खर्चुन एक भव्य ‘केबलस्टेड’ पूल उभारण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने रेवस ते रेड्डी असा ४९८ किलोमीटर लांबीचा समुद्री महामार्गाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या समुद्री महामार्गामुळे रायगडच्या किनारपट्टीचा भाग, तसेच पुढे रत्नागिरी जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या खाड्या आणि त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी गाव असे महत्त्वाचे भाग जोडले जाणार आहेत. या सागरी महामार्गासाठी ७हजार ८५१ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
या सागरी महामार्गावर रेवस, धरमतर, कुंडलिका, आगरदांडा, बाणकोट, केळशी, जयगड आणि कुणकेश्वर असे एकूण ७ पूल उभारण्यात येणार आहेत. यापैकी रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड खाडीवर ७१५ कोटी रुपयांचा ‘केबलस्टेड’ पूल उभारला जाईल. या पुलाची लांबी २०९ किलोमीटर इतकी असून, रुंदी १८ मीटर असणार आहे. दोन पदरी वाहतुकीसाठी असणाऱ्या या पुलावर पर्यटकांसाठी दोन्ही बाजूला पादचारी रस्त्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या पादचारी रस्त्यावरून पर्यटकांना जयगड खाडीचे मनोहारी दृश्य न्याहाळता येईल.