जयगडमध्ये अमली पदार्थांच्या तस्कराचा पर्दाफाश; तरुण गजाआड

रत्नागिरी:- अमली पदार्थमुक्त जिल्हा करण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी सुरू केलेल्या ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत जयगड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जयगड येथील जे.एस.डब्लू. लेबर कॉलनी परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या एका संशयित तरुणाला पोलिसांनी रंगेहात पकडले असून, त्याच्याकडून सुमारे २३,५२० रुपयांचा ७३४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.

​जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांनी जिल्ह्यात अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने जयगड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री गस्त घालत होते.

रात्री ८:५५ च्या सुमारास, नांदिवडे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जे.एस.डब्लू. लेबर कॉलनीच्या कंपाउंडजवळ एक इसम सॅक घेऊन संशयास्पद रित्या उभा असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्याला जागीच थांबवून चौकशी केली असता त्याचे नाव सिंटु कुमार राम मिस्त्री (वय ३०, मूळ रा. खगरीया, बिहार; सध्या रा. नांदिवडे, रत्नागिरी) असल्याचे समोर आले.

​दोन पंचांच्या उपस्थितीत आरोपीची अंगझडती घेतली असता, त्याच्या जवळील काळ्या रंगाच्या सॅकमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत भरलेला उग्र वासाचा, पाने-फुले-बोंडे असलेला ७३४ ग्रॅम गांजा आढळला. या मुद्देमालाची किंमत २३,५२० रुपये इतकी असून तो विक्रीच्या उद्देशाने आणल्याचे स्पष्ट झाले आहे.

​आरोपी सिंटु कुमार मिस्त्री याच्याविरुद्ध जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १०/२०२६, एन.डी.पी.एस कायद्याच्या कलम ८ (क) आणि २० (ब) ii (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी
​ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ​श्री. संजय पाटील (स. पो. निरीक्षक), विलास दिडपसे (पो. उपनिरीक्षक) ​मिलिंद कदम (पोलीस हवालदार), ​संतोष शिंदे (पोलीस हवालदार), ​प्रितेष लोटणकर (पोलीस शिपाई) या पथकाने केली.

​या कारवाईमुळे परिसरात अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास जयगड पोलीस करत आहेत.