जमिनीच्या वादातून मालमत्तेचे नुकसान; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

लांजा:- तालुक्यातील वेरवली बुद्रुक (डोळसवाडी) येथे जमिनीच्या वादातून एका ६७ वर्षीय वृद्धेच्या मालमत्तेचे नुकसान करून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीमती दिपाली दिपक डोळस (वय ६७, रा. कुर्ला, मुंबई; मूळ रा. वेरवली बुद्रुक) यांची वेरवली बुद्रुक येथे गट क्र. ८९९ आणि ९०७ मध्ये सामाईक मालकीची जमीन आहे. २३ जानेवारी ते २४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत, या जमिनीतून रस्ता करण्यासाठी आरोपींनी फिर्यादीची कोणतीही संमती न घेता अतिक्रमण केले.

शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले.
जमिनीला असलेले चिऱ्याचे कंपाउंड आणि सिमेंटचे खांब तोडून टाकले. त्या ठिकाणी अनधिकृतपणे चिरे लावून अतिक्रमण केले.

जेव्हा फिर्यादीने या प्रकाराबाबत विचारणा केली, तेव्हा आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

​याप्रकरणी पोलिसांनी विशाल मारुती डोळस (रा. वेरवली बुद्रुक, लांजा), प्रशांत हरीश्चंद्र शेट्ये (मूळ रा. रायपाटण, सध्या रा. कल्याण),प्रदिप श्रीधर डोळस (रा. वेरवली बुद्रुक, लांजा) या व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

​फिर्यादी दिपाली डोळस यांनी २७ फेब्रुवारी रोजी लांजा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३२९(३), ३२४(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर ३४/२०२६ नुसार नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास स्थानिक पोलीस करत आहेत.