जमिनीच्या वादातून बापलेकाला मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा

चिपळूण:- तालुक्यातील दळवटणे येथील रामवाडी भागात जमिनीच्या वादातून दोघा सख्ख्या भावांनी एका तरुणाला व त्याच्या वडिलांना लाकडी काठीने मारहाण करून जखमी केले. ही घटना १६ एप्रिल रोजी सकाळी ९.०० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भरत सीताराम जाधव (वय ४०, रा. कळंबस्ते, चिपळूण) हे त्यांचे वडील सीताराम शिवराम जाधव (वय ८०), आई आणि भाऊ तसेच लाकडे तोडणारा शिवगण यांच्यासोबत त्यांच्या मालकीच्या सर्वे क्रमांक ८२७ मध्ये लाकडे तोडण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी निलेश रमेश चव्हाण आणि राकेश रमेश चव्हाण हे तेथे आले आणि फिर्यादी यांच्याशी जमिनीवरून वाद घालू लागले.

फिर्यादी भरत जाधव यांनी दोघा भावांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि अधिक वाद नको म्हणून ते घराकडे निघाले. त्याचवेळी आरोपी निलेश आणि राकेश चव्हाण यांनी पाठीमागून येऊन भरत जाधव यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी आणलेल्या लाकडी काठीने अचानक भरत जाधव आणि त्यांचे वडील सीताराम जाधव यांना मारहाण केली, ज्यामुळे दोघेही जखमी झाले. मारहाण करताना आरोपींनी दोघांनाही ठार मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी भरत जाधव यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी निलेश रमेश चव्हाण आणि राकेश रमेश चव्हाण यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१), ३५२, ३५१(२ (३), ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे.