दापोली:-दापोली तालुक्यातील देगाव येथील बौद्धवाडी येथे रहाणारे भंगार व्यावसायिक गंगाराम शुक्ला यांना वीस नागरिकांच्या जमावाने मारहाण करून घरातील सामानाची नासधुस केल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानकात नोंदविण्यात आली आहे.
दापोली पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल शनिवार दि.०९ एप्रिल रोजी दुपारी दोनच्या दरम्यान जमिनीच्या वादातून देगाव येथे वीस पेक्षा अधिक जणांच्या जमावाने भंगारवाल्यांच्या वाड्यावर हल्ला केला आणि प्रचंड नुकसान केले. याप्रसंगी शुक्ला यांचे वाड्यातील धान्य व इतर सामानाची नासधुस करून काही सामान शेजारील शेतात डिझेल टाकून देऊन पेटविण्यात आले.
तर बाहेर उभी असलेली टाटा एक्सल गाडीची काच फोडून ती उलटवून टाकण्यात आली. तसेच घर बांधणीसाठी आणलेल्या तीन पाण्याच्या टाक्या देखील फोडून टाकण्यात आल्या. शुक्ला हे या प्रकाराने भयभीत झाल्याने जीव वाचवण्याच्या उद्देशाने मुकुंद सिताराम मंडपे यांच्या माळ्यावर लपून बसले.हे या जमावाला समजल्यावर या जमावाने मंडपे यांच्या घरात शिरून त्यानाही मारहाण केली.









