जमिनीचा बळजबरीने कब्जा घेण्यासाठी दमबाजी; तिघांविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- रत्नागिरीतील आंबेकरवाडी येथील जमिनीचा बळजबरीने कब्जा घेण्यासाठी वेळोवेळी जागेत येऊन दमबाजी करणार्‍या तिघांविरूद्ध ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जमीन मालकाला धमकावणार्‍या या तिघांविरूद्ध जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारीवेळी दिलेल्या जबानीत भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकार्‍यांविरूद्धही जबाब देण्यात आला आहे.

तालुक्यातील आंबेकरवाडी येथे अनिलकुमार हरिश्चंद्र वेतोसकर यांची गट क्र. 3/8 जागा आहे. या जागेत सुधाकर विठोबा सुर्वे, नीता सुधाकर सुर्वे (दोघेही रा. कुवारबांव), गुरूप्रसाद नंदकुमार चव्हाण यांनी शुक्रवारी घुसखोरी केली. गुरूप्रसाद चव्हाण हा मनविसेचा जिल्हाध्यक्ष आहे. सुर्वे आणि वेतोसकर यांचा याच जमिनीच्या मालकीवरून वाद आहे. शुक्रवारी घुसखोरी केल्यानंतर त्यांना अटकाव केल्यानंतर त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करून धमकी देऊन या मिळकतीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी जागेसभोवताली घातलेला बांध तोडण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

तक्रारदार अनिलकुमार वेतोसकर यांनी या जमिनीच्या शासकीय कागदपत्रात अफरातफर झाली असल्याचा आरोप पोलिसांना दिलेल्या जबाबात केला आहे. जागेच्या गटबुक नकाशात अफरातफर केल्याने हेच आरोपी वारंवार जागेचा कब्जा घेण्यासाठी घुसखोरी करतात, असेही जबाबात म्हटले आहे.

जमिनीची खोटी कागदपत्रे करणार्‍या भूमी अभिलेख विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांविरूद्धही कारवाई करण्याची मागणी केली आहे. यापूर्वीही या तीन आरोपींकडून जागेत घुसखोरी झाली असून, त्यावेळीही तक्रारदार जागा मालक अनिलकुमार वेतोसकर यांनी ग्रामीण पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. त्यावेळीही जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.