जन आशिर्वाद यात्रेत चोरट्यांचा धुमाकूळ; सोन्याच्या चैनी, पाकिटे लंपास 

रत्नागिरी:-केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेत चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला. या जन आशिर्वाद यात्रेत चोरट्यांनी मोठी हातसफाई केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काही जणांच्या चैन तर काही जणांची पाकिटे लांबविल्याचा प्रकार जन आशिर्वाद यात्रेत  घडल्याची चर्चा सध्या शहरात सुरु झाली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची थांबलेली जन आशिर्वाद यात्रा शुक्रवारपासून पुन्हा सुरु झाली. सकाळी नाम. राणे यांचे हेलिकॉप्टरने रत्नागिरीत आगमन झाले आणि त्यानंतर त्यांच्या जन आशिर्वाद यात्रेला सुरुवात झाली. सर्वत्र ढोलताशे आणि घोषणाबाजी सुरु होती. मारुतीमंदिर परिसर तर गर्दीने फुलून गेला. काही नवीन चेहरे देखील हातात झेंडे घेवून मारुतीमंदिर परिसरात पहायला मिळाले.
मारुतीमंदिर सर्कल येथे नाम. नारायण राणे यांचे आगमन झाले आणि सारा परिसर घोषणाबाजीने दणाणून गेला. राणेंचे स्वागत करण्यासाठी मारुतीमंदिर येथे मोठी झुंबड उडाली होती. मात्र या गर्दीत काही अनोळखी चेहरे घुसले होते आणि या अनोळखी व्यक्तींनी जन आशिर्वाद यात्रेत हातसफाई करुन भाजप कार्यकर्त्यांना चांगलाच दणका दिला.

ना. राणेंचे स्वागत होत असताना काही अनोळखी चेहर्‍यांनी गर्दीत पुढे होऊन हातचलाखी करत दोघा-तिघांच्या सोन्याच्या चैन बघता बघता गळ्यातून उडविल्या. त्यामध्ये एका भाजप नगरसेवकाच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याची चैन देखील लांबविल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याची चर्चा शहरात सुरु आहे. तर या गर्दीतच काही जणांची पाकिटे मारण्याचे प्रकार घडल्याचे देखील आता पुढे येवू लागले आहे.