जन्मल्यानंतर अवघ्या २ दिवसांत नवजात बालिकेचा मृत्यू

रत्नागिरी:- चिपळूण तालुक्यातील कापसाळ-माटेवाडी येथे एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. जन्मल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत एका नवजात मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. २८ ऑक्टोबर रोजी पहाटे ४.४५ वाजता ही घटना घडली असून, यामुळे राणे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेची माहिती पोलीस दप्तरी दाखल करण्यात आली असून, चिपळूण पोलीस ठाण्यात आमृ. क्रमांक ६५/२०२५ बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे या प्रकरणाची नोंद झाली आहे. फिर्यादी अरुण अशोक राणे, मूळ रा. तोंडलीपिलवली, मिरवणेवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी, हे सध्या कापसाळ, मतेवाडी येथे वास्तव्यास आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अरुण राणे यांची पत्नी सोनाली अरुण राणे यांनी २५ ऑक्टोबर २०२५ रोजी मार्कडी येथील हजबे डॉक्टर यांच्या रुग्णालयात एका नवजात स्त्री जातीच्या बालिकेला जन्म दिला होता. प्रसूतीनंतर सोनाली आणि बालिकेला २६ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आणि ते कापसळ येथील घरी परतले.

२७ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता सोनाली यांनी आपल्या नवजात कन्येला दूध पाजून झोपवले आणि त्यानंतर त्याही झोपी गेल्या. मात्र, २८ ऑक्टोबर रोजी पहाटे ४.४५ वाजण्याच्या सुमारास सोनाली यांना बालिकेची हालचाल होत नसल्याचे आणि ती रडत नसल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने पती अरुण राणे यांना ही माहिती दिली.

बाळाची स्थिती पाहून राणे कुटुंबीयांनी विलंब न लावता नवजात बालिकेला उपचारासाठी कामथे हॉस्पिटल येथे दाखल केले. परंतु, तेथील डॉक्टरांनी बालिकेची तपासणी केली असता, तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.