प्रलंबित मागण्यांसाठी शेकडो शिक्षक रस्त्यावर, प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात शिक्षक समितीचा एल्गार
रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, जिल्हा शाखा रत्नागिरीच्या वतीने आज रत्नागिरी जिल्हा परिषदेसमोर विविध प्रलंबित मागण्यांसाठी शेकडो प्राथमिक शिक्षकांनी आक्रमक धरणे आंदोलन केले. गेल्या अनेक महिन्यांपासून शिक्षकांच्या ज्वलंत प्रश्नांकडे जिल्हा परिषद प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता. अखेर सोमवारी दुपारी ३ वाजता जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या शेकडो शिक्षकांनी जिल्हा परिषद कार्यालयावर धडक दिली आणि प्रशासनाच्या उदासीन धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. हे धरणे आंदोलन सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू होते.या आंदोलनाचे नेतृत्व शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप महाडिक यांनी केले.
आंदोलनादरम्यान शिक्षकांनी प्रामुख्याने १५ मार्च २०२४ च्या संचमान्यता शासन निर्णयातील जाचक अटी आणि त्रुटी तातडीने दूर करण्याची मागणी केली. याशिवाय पदवीधर शिक्षकांचे उपशिक्षक पदावर झालेले चुकीचे समायोजन रद्द करावे आणि शाळांमधील गणित व विज्ञान विषयांची रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी आग्रही मागणी शिक्षकांनी लावून धरली. सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणी दरम्यान राहिलेल्या त्रुटी दूर करून शिक्षकांना त्यांचा हक्काचा मोबदला मिळावा, तसेच शिक्षण विभागातील पदोन्नती आणि बदल्यांच्या प्रलंबित फाईल्स त्वरित निकाली काढाव्यात, याकडेही प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.वारंवार पत्रव्यवहार आणि मागण्या करूनही शिक्षण विभागाकडून केवळ आश्वासने मिळत असल्याने शिक्षकांना अखेर रस्त्यावर उतरावे लागले. आंदोलनाच्या सांगतेवेळी शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले. प्रशासनाने या मागण्यांवर सकारात्मक आणि कालमर्यादित निर्णय न घेतल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष दिलीप महाडिक आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.









