Wednesday, June 10, 2026
spot_img
Home खेड जगबुडी नदीत बुडून तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

जगबुडी नदीत बुडून तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

खेड:- खेड शहर आणि भोस्ते गावाच्या सीमेवर वाहणाऱ्या जगबुडी नदीच्या डोहात अंघोळीसाठी गेलेल्या चार तरुणांपैकी तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण खेड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी आणि पोहण्याचा आनंद घेण्यासाठी चार तरुण जगबुडी नदीच्या पात्रात उतरले होते. खेड शहर आणि भोस्ते गावाच्या दरम्यान असलेल्या एका खोल डोहाच्या ठिकाणी ते आंघोळ करत होते. मात्र, नदीच्या या भागातील पाण्याच्या खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्यामुळे चौघेही अचानक पाण्यात बुडू लागले. तरुणांनी वाचण्यासाठी आरडाओरड केली, मात्र पाण्याचा वेग आणि खोली जास्त असल्याने आकाश रामा कांबळे, नरेश रामा कांबळे आणि कैलास रामा कांबळे हे तिघे जण पाण्याच्या प्रवाहात बेपत्ता झाले. या दुर्घटनेत सुदैवाने एका तरुणाला वाचवण्यात यश आले असून तो सुखरूप आहे.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. दरम्यान, खेड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण खेड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पंचनामा केला आहे. खेड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे. नदी, धरणे किंवा डोहाच्या ठिकाणी पर्यटकांची आणि तरुणांची गर्दी होत असते. मात्र, बऱ्याचदा पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने अशा दुर्घटना घडतात. या तीन तरुण मुलांच्या अकाली निधनामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.