चौपदरीकरणाच्या कासवगतीने सुरु असलेल्या कामाचा फटका स्थानिकांना

रत्नागिरी:- मुंबई -गोवा महामार्ग चौपदरीकरणातील आरवली ते वाकेड येथील धिम्या गतीने सुरु असलेल्या कामाचा फटका स्थानिकांना बसत आहे. पाली बाजारपेठेतील विद्युत खांब स्थलांतरणाची प्रक्रिया गेल्या दोन महिन्यांपासून सुरु आहे. त्यामुळे दिवसभर विद्युत पुरवठा बंद ठेवला जातो. त्याचा त्रास स्थानिक व्यापारी, शासकीय कार्यालये, बँका यांना होत असून नियमित कामकाजावर परिणाम होत आहे. याबाबत ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी केली आहे.

महामार्ग चौपदरीकरणातील विशेषतः पाली बाजारपेठेत फेब्रुवारी महिन्यात रुंदीकरणातील विद्युत वाहिन्यांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरु झाली होती. त्यावेळी महामार्गाच्या खालून क्रॉसिंग पास वाहिनीसाठी पाईपही टाकण्यात आले. त्यानंतर हे काम बंद होते; मात्र गेल्या महिन्यात ते सुरु झाले असून महामार्गाच्या एका बाजूला नवीन विद्युत खांबावर विद्युत वाहिनी ओढून पूर्ण झाली आहे. तर एका बाजूची कामे अद्यापही अपूर्ण असल्याने त्या कामाकरीता या भागातील विद्युत पुरवठा दिवसभर खंडीत केला जातो. येथील शासकीय कार्यालयांचे काम बंद राहते. पाली बाजारपेठेत चौपदरीकरणातील भुसंपादीत जागेत येणा-या या विद्युत खांबाचे काम कंत्राटीतत्वावर सुरु आहे. त्यात बाजारपेठेतील नवीन विद्युत खांबावर टाकण्यात आलेल्या विद्युत वाहिनीवरुन नवीन जोडण्या देताना पूर्वीच्या जास्त अंतराच्या वाढीव सर्व्हिस वायर कंत्राटी कामगारांकडून कापून परस्पर नेण्यात येत आहेत. ग्राहकांचे नुकसान होते असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.