रत्नागिरी:- परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम करणार्या कंत्राटदाराने घाटातील चार ते पाच वहाळाच्या मोर्या बुजवून त्याचे पाणी एकाच मोरीमध्ये सोडल्याने घाटाच्या दरीकडील डोंगर घसरल्याने सहा घरे मातीच्या ढिगार्याखाली सापडून होत्याचे नव्हते झाले. एकाच कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यू झाला असून दोन वर्षाच्या बालकाचा अद्यापही शोध लागलेला नाही.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरु असून परशुराम घाटात काम करणार्या कंपनीने हॉटेल ताजपासून खाली येणार्या चार ते पाच जुन्या मार्गावरील मोर्या बुजवल्या. या सर्व मोर्यांमधील पाणी पेढे कुंभारवाडीजवळील नाल्यामध्ये सोडण्यात आले आहे. पाच मोर्यांचे पाणी एकाच मोरीत सोडल्याने पाण्याच्या प्रवाहात गेल्या काही दिवसात वाढ झाली होती. त्यातच चार दिवसापूर्वी पडलेल्या पावसात मोठ्याप्रमाणात पाणी या साचून डोंगराच्या मातीत मुरले. काही दिवसापुर्वी या भागात एक ट्रक पलटी झाल्याने दरड घसरली होती. या घसरलेल्या दरडीमधून पाणी वाहू लागले होते. चार दिवसापूर्वी पहाटे साडेपाच-पावणेसहा वाजण्याच्या सुमारास पाण्याच्या मोठ्या झोताबरोबर माती व दरड घसरुन खाली आली. यात मांडवकर कुटुंबियांची सहा घरे गाडली गेली. यात अर्चना हरिश्चंद्र मांडवकर व त्यांची सून आरोही अविनाश मांडवकर यांचा माती खाली दबून मृत्यू झाला. यात आरोही यांचा मुलगा आरुष हा अद्यापही सापडलेला नाही.
माती आणि पाण्याचा वेग एवढा होता की घराबाहेर आलेल्या तीनचार व्यक्ती शंभर-दीडशेफुट वाहून गेल्या. या घरांमधील काही व्यक्ती मुंबईला असल्याने जिवीतहानी जास्त झाली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अर्चना मांडवकर यांच्या पतीचे वीस दिवसांपूर्वीच निधन झाले होते. वडिलांचे कार्य करुन त्यांचा मुलगा अविनाश घटनेच्या दोन दिवसापूर्वी मुंबईला गेल्याने बचावला.
या आपत्तीला जबाबदार असणार्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी पेढे ग्रामस्थांन केली आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व या कुटुंबियांची भेट घेत त्यांना धीर दिला. मातीच्या ढिगार्याखाली असलेल्या आरुषचा शोध अद्यापही सुरु असून एनडीआरएफची मदत घेण्यात येत आहे.