चोवीस तासांच्या अथक प्रयत्नानंतर कोकण रेल्वे मार्ग पूर्ववत

मांडवी एक्स्प्रेस दिवाणखवटी बोगद्यातून रवाना

रत्नागिरी:- कोकण रेल्वे ठप्प झाल्याने कालपासून कोकण रेल्वेमार्गावर अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. तब्बल २४ तासांच्या अथक प्रयत्नानंतर कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी येथे आलेला मातीचा भराव दूर करण्यात आला असून रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार रेल्वे मार्ग वाहतूक सुरु करण्यासाठी योग्य असल्याचे ट्रॅक फिट सर्टिफिकेट आज ४:३० वाजता जारी करण्यात आले असून या मार्गावरील वाहतूक सुरु करण्यात आली आहे. मांडवी एक्स्प्रेस दिवाणखवटी बोगद्यातून रवाना करण्यात आली आहे.

काल सुटलेल्या 12052 जनशताब्दी एक्सप्रेस ,22120 तेजस एक्सप्रेस , 20112 कोकण कन्या एक्सप्रेस आणि 11004 तुतारी एक्सप्रेस या गाड्या रत्नागिरीपर्यंत आणून रद्द करण्यात आलेल्या आहेत.

आज सुटणाऱ्या काही गाड्यांच्या सुटण्याच्या वेळेत बदल करण्यात आलेला आहे. यामध्ये 11100 मडगाव एलटीटी मडगावहून सायंकाळी सहा वाजून 30 मिनिटांनी सुटेल. 12052 मडगाव सीएसटीएम जनशताब्दी एक्सप्रेस मडगावहून रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी सुटेल.20112 मडगाव सीएसटीएम कोकण कन्या एक्सप्रेस मडगावहून आज रात्र अकरा वाजून 30 मिनिटांनी सुटेल तर 11004 सावंतवाडी दादर तुतारी एक्सप्रेस सावंतवाडीहून रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी सुटेल.