चोरीप्रकरणी मोलकरणीस दोन वर्षांची शिक्षा

सोलगाव-राजापुरातील घटना; विश्वास संपादन करून कृत्य

राजापूर:- दांपत्याच्या घरी मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या महिलेला दागिने चोरी केल्याबद्दल दोन वर्षांचा तुरुंगवास आणि पाच हजार रुपये दंड सुनावण्यात आला. राजापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. हाके यांनी ही शिक्षा सुनावली आहे. वैष्णवी विलास नलावडे (वय ४२) असे शिक्षा सुनावलेल्या महिलेचे नाव आहे.

राजापूर तालुक्यातील सोलगाव भटवाडी येथील चंद्रकांत शेलार हे पत्नी चंद्रकला (६४) यांच्यासोबत राहतात. पत्नीला घरकाम करताना त्रास होतो. त्यामुळे शेलार यांनी मोलकरीण हवी आहे, अशी जाहिरात स्थानिक वर्तमानपत्रांतून दिली. त्या जाहिरातीद्वारे वैष्णवी नलावडे ही शेलार यांच्याकडे घरकामासाठी आली. पंधरा दिवस काम करून तिने शेलार दाम्पत्याचा विश्वास संपादन केला. दरम्यान, ८ मार्च २०२५ रोजी दुपारी शेलार दांपत्य जेवण करून हॉलमध्ये झोपले होते. वैष्णवी मी टॉयलेटला जाऊन येते, असे सांगून मागच्या दरवाज्याने निघून गेली. ती परत आली नाही म्हणून चंद्रकला शेलार यांनी शोध घेतला, तर त्यांना वैष्णवी कुठेही दिसली नाही. त्यांनी घरात येऊन वैष्णवी हिचे साहित्य पाहिले, तर तिचे साहित्यदेखील घरात नव्हते. त्यानंतर कपाट उघडून पाहिले असता कपाटाच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले दागिने व रुपये पाच हजारांची रोख रक्कम चोरीला गेल्यांचे आढळले. त्यावरून चंद्रकांत शेलार यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

चोरीला गेलेल्या मुद्देमालात ३ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ३.५ ग्रॅम वजनाचे कानातील रिंग जोड, ४ ग्रॅम वजनाच्या कानातील कुड्यांचा जोड व ५ हजार रुपये रोख, अशा एकूण २ लाख १३ हजार ७६० रुपयांच्या वस्तूंचा समावेश होता. यानंतर नलावडे ही गुजरातमधील वलसाड येथे तिच्या ओळखीच्या व्यक्तीकडे गेली. दरम्यान, पोलिसांनी तिच्या मोबाईल लोकेशन यावरून तपास सुरू केला. त्या आधारे गुजरातवरून परत येताना तिला चिपळूण बसस्थानकात अटक करण्यात आली.

पोलिसांनी घेतलेल्या अंगझडतीमध्ये वैष्णवी हिच्याकडे शेलार यांच्या घरातून चोरलेले २ लाख ८ हजार ७६० रुपये किमतीचे ३ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, रुपये पाच हजार रोख रक्कम व इतर खोटे दागिने सापडले होते. या प्रकरणाची सुनावणी ३ जून रोजी सुरू झाली, या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मोबीन शेख यांनी केला. कोर्ट पैरवी म्हणून सचिन बळीप यांनी काम पाहिले. सहायक सरकारी वकील भालचंद्र सुभाष सुपेकर यांनी अंतिम युक्तिवाद केला.