चोरलेल्या पर्समधील मोबाईलद्वारे पैसे काढणाऱ्यास अटक

संगमेश्वर:- रेल्वेमध्ये महिलेच्या पर्समधील मोबाईलचा वापर करून बँक खात्यातील पैसे काढणाऱ्या आरोपीस संगमेश्वर पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी प्रिया ज्ञानेश्वर संकपाळ, (वय ५८ वर्षे, रा. आचिर्णे, पिंपळवाडी, ता. वैभववाडी, जि. सिधुदूर्ग) या आपले पतीसह दिनांक २५/०६/२०२४ रोजी दादर ते सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस क्रं. ११००३ कोच क्र. ए ४ सिट नं ७ ने दादर येथून प्रवास करीत असताना रात्रौ ०३.०० वा. चे सुमारास त्यांना झोप लागली. त्यानंतर फिर्यादी या सकाळी ०६.०० वा. कडवई रेल्वे स्टेशन येथे आल्या असता त्यांना त्यांची पर्स चोरीस गेल्याचे लक्षात आले. सदर पर्समध्ये त्यांचा वापरता विवो कंपनीचा मोबाईल, रोख रक्कम रु १९४०/-, वापरता चष्मा व पॅनकार्ड, आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र अशी कागदपत्रे होती. त्यानंतर फिर्यादी यांनी वैभववाडी, जि. सिंधूदुर्ग येथे जावून त्यांचे बैंक खाते पाहिले असता त्याचे खात्यातील रु. १,००,०००/- कोणीतरी अज्ञात व्यक्तीने काढल्याचे दिसून आले.

दरम्यान, फिर्यादी यांनी त्यांचे पर्ससह त्यातील रु. १२,९४०/- रक्कमेचा मुद्देमाल चोरीस गेलेबाबत व पर्समधील चोरीस गेलेला मोबाईल व कागदपत्रांचा वापर करून रु. १,००,०००/- त्यांचे खात्यातून काढून घेतलेबाबत फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरून वैभववाडी पोलीस ठाणे, जि. सिधुदूर्ग येथे तक्रार दाखल होवून ती तक्रार दिनांक २६/०६/२०२४ रोजी संगमेश्वर पोलीस ठाणे येथे गु. रजि. नं. ४७/२०२४, भा.दं. वि.क. ३७९, ४२० प्रमाणे अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

दाखल गुन्हयाचा तपास सपोफौ/२४० कांबळे हे करीत असताना संशयीत इसम नामे मनिष रमेश पावसकर, (वय ३१ वर्षे, रा. जानवळे, वाणेवाडी नं. १, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) याचा गुन्हयाचे कामी तळोजा, मुंबई येथे जावून शोध घेवून ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने सदरची चोरी करून त्यामधील मोबाईलचा व कागदपत्रांचा वापर करून फिर्यादी यांचे खात्यातील रु. १,००,०००/- रक्कम आपल्या बँक खात्यात जमा करून घेतल्याची कबुली दिलेली असल्याने त्यास गुन्हयाचे कामी अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी मा. घनंजय कुलकर्णी, पोलीस अधीक्षक रत्नागिरी, श्रीमती जयश्री गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी, मा. निलेश माईनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती स्मिता सुतार, पोलीस निरीक्षक, संगमेश्वर पोलीस ठाणे, श्री. एस. बी. नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक यांचे सुचनेनुसार सपोफौ/२४० सी. टी. कांबळे, पोहेकॉ/९०१ व्ही. बी. बरगाले, पोना/१२७३ व्ही. व्ही. मनवल, पोकॉ/३९ एस. व्ही. आव्हाड, पोकों/शेलार (सायबर) यांनी केली आहे.