चोरटे सक्रिय; रत्नागिरीत स्प्लेंडर मोटरसायकलची चोरी

रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यातील पोचरी फाटा येथून एका शेतकऱ्याची दहा हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास करत दोन आरोपींना अटक केली आहे.

ही घटना बुधवार, ३ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते दुपारी १२.३० च्या दरम्यान खालगाव-जाकादेवी येथील पोचरी फाटा येथे घडली. या मोटारसायकलचा मालक रघुनाथ सखाराम गोताड (रा. खालगाव-जाकादेवी) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची एम.एच.०८/एल/२७७९ क्रमांकाची निळ्या रंगाची मोटारसायकल त्यांच्या संमतीशिवाय आणि फसवणुकीच्या इराद्याने चोरून नेण्यात आली.

या घटनेची तक्रार गोताड यांनी ५ सप्टेंबर रोजी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. गु.र.क्र. १६८/२०२५ नुसार भादंवि कलम ३०३(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी केलेल्या जलद तपासामुळे या गुन्ह्यात सहभागी असलेल्या श्रीराज प्रसाद सावंत आणि राजेंद्र राजन शिके (दोघेही रा. मांजरे देसाईवाडी, ता. संगमेश्वर) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनी संगनमताने आणि नियोजित कट रचून ही चोरी केली आहे. या घटनेचा पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत आहेत.