रत्नागिरी:- जमीन व्यवहारात दिलेला धनादेश वटला नसल्याप्रकरणी न्यायालयाने संशयिताला सहा महिने साधा कारावास व भरपाई म्हणून एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. कृष्णकांत केशव नागवेकर (वय ४०, रा. टेंभ्ये, रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी उगाकांत शंकर सनगर (वय ५८, रा. साळवी स्टॉप, रत्नागिरी) यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती.
कृष्णकांत नागवेकर व उगाकांत सनगर यांची ओळख आंबा व्यवसायातून झाली होती. दरम्यान आर्थिक अडचणीत सापडल्याने कृष्णकांत यांनी टेंभ्ये व लांजा येथील आपली जमीन उगाकांत यांना विकण्याचा निर्णय घेतला. या व्यवहारासाठी साठेखत तयार करताना उगाकांत यांनी सहा लाख रुपये कृष्णकांत यांना अदा केले होते. मात्र जागेचे पैसे घेतल्यानंतरही कृष्णकांत यांनी उगाकांत यांना खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ केली.
खरेदीखत होत नसल्याने उगाकांत यांनी आपले पैसे परत देण्याची मागणी केली. त्यावेळी कृष्णकांत यांनी १६ एप्रिल २०१९ रोजीचा एक लाख रुपयांचा धनादेश उगाकांत यांना दिला. मात्र हा धनादेश बँकेत सादर केला असता खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो अनादरित झाला.
या प्रकरणी उगाकांत सनगर यांनी न्यायालयात दाद मागितली. सुनावणीनंतर न्यायालयाने कृष्णकांत नागवेकर याला सहा महिने साधा कारावास व तक्रारदारास भरपाई म्हणून एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या खटल्यात तक्रारदारांच्या वतीने अॅड. गच्छींद्र आंद्रे यांनी काम पाहिले.









