चिपळूण:- एक महिन्याच्या मुलीचा खून करणाऱ्या एका मातेला चिपळूण जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी हा ऐतिहासिक निकाल दिला.
हा धक्कादायक प्रकार चिपळूण तालुक्यातील वहाळ, घडशीवाडी येथे घडला होता. आरोपी शिल्पा प्रवीण खापले (वय अंदाजे २५) ही तिच्या दोन लहान मुली, पती आणि सासू-सासऱ्यांसोबत राहत होती. पहिल्या मुलीच्या जन्मानंतर तिला दुसऱ्या वेळी मुलगा हवा होता. परंतु, दुसऱ्या वेळी देखील मुलगीच झाल्यामुळे ती प्रचंड नाराज होती.
५ मार्च २०२१ रोजी तिचा पती रत्नागिरी येथे गेला होता. दुपारच्या वेळी घरात कोणी नसताना, तिने आपल्या एक महिन्याच्या मुलीला पाण्याने भरलेल्या बादलीत डोके खाली आणि पाय वर अशा अवस्थेत बुडवून तिचा खून केला. नंतर, शेजारी गोळा झाल्यावर तिने बेशुद्ध पडल्याचे नाटक करत ‘मी हे केले नाही’ असे भासवण्याचा प्रयत्न केला.
सुरुवातीला सावर्डे पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली. परंतु, गुन्ह्याची पार्श्वभूमी आणि एकूण परिस्थिती लक्षात घेता, हा खूनच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीस उपअधीक्षक सचिन बारी यांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला. तपासाअंती आरोपी माता शिल्पा खापले हिनेच हा खून केल्याचे समोर आले आणि तिच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले.
या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांच्यासमोर झाली. सरकारी पक्षातर्फे ॲड. अनुपमा ठाकुर यांनी आरोपीचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी १५ साक्षीदार तपासले. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, पोलीस अधिकारी आणि शेजाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण साक्षींचा समावेश होता. ॲड. ठाकुर यांनी सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे विविध न्यायनिवाडे सादर करून आरोपीने केलेल्या क्रूर कृत्याचा पर्दाफाश केला.
न्यायालयाने या प्रकरणात सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे, साक्षीदारांच्या नोंदी आणि सखोल युक्तिवाद ग्राह्य धरला. आरोपी शिल्पा खापले हिला दोषी ठरवत, न्यायालयाने तिला आजीवन कारावास आणि २५ हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास तिला आणखी दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागणार आहे.
या निकालादरम्यान न्यायालयाने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या सामाजिक मोहिमेचा आणि संविधानाने मुलींना दिलेल्या अधिकारांचा उल्लेख केला. स्वतः एक महिला असूनही आरोपीने मुलाच्या हव्यासापोटी आपल्याच मुलीचा खून केल्यामुळे तिला कठोर शिक्षा देण्यात आली. या निकालातून न्यायालयाने समाजात स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला आहे.
या केसमध्ये सरकारी वकील म्हणून श्रीमती ठाकुर यांनी, तर पोलीस उपअधीक्षक बारी यांनी तपास अधिकारी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. पोलीस कॉन्स्टेबल श्री. कांबळे यांनी कोर्ट पैरवी म्हणून काम पाहिले.