चिपळूण शहरात पुराचं पाणी, बाजारपेठ पाण्याखाली

महामार्गावरील वाशिष्ठी पूल वाहतुकीसाठी बंद

चिपळूण:- जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी तर पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे. दरम्यान चिपळूणमध्ये तर पावसाने हाहाकार माजवला आहे. रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून नदीला पूर आला आहे, आणि या पुराचे पाणी चिपळूण बाजारपेठेत घुसलं आहे. त्यामुळे महसूल विभाग, नगरपालिका प्रशासन सतर्क झाले आहे. दरम्यान या पुराच्या पाण्यामुळे चिपळूण बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी आहे, तर काही ठिकाणी 4 ते 5 फूट पाणी आहे.

शहरातील पूजा टॉकिजपर्यंत पाणी आहे, तसेच बाजारपूल पाण्याखाली गेला आहे. चिपळूण शहरातील मध्यवर्ती बसस्थानकपर्यंत पाणी शिरले आहे. त्यामुळे बसस्थानकातील सर्व एसटीच्या गाड्या बाहेर काढण्यात आल्या आहेत. चिपळूण शहरातील वडनाका, चिंचनाका, पेठमाप अशा भागात मोठ्या प्रमाणात पाणी घुसले आहे. तर सांस्कृतिक केंद्राच्या परीसरातही पुराचा वेढा पडला आहे. या पुरामुळे चिपळूण शहरातील व्यापाऱ्यांचे, नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

दरम्यान वाशिष्ठीने धोक्याची पातळी ओलांडल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील बहादूरशेख नाका येथील पूल काल( शनिवार) रात्री वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता, मात्र नदीची धोक्याची पातळी कायम असल्याने सकाळीही हा पूल वाहतुकीसाठी बंद होता. यामुळे वाहतूक गुहागर बायपास रोडकडून वळविण्यात आली आहे.