चिपळूण:- चिपळूणकडून सुरळकडे गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणारी क्रेटा गाडी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पकडली. या कारवाईत गोवा बनावटीच्या दारूसह क्रेटा गाडी असा १४ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे रत्नागिरी जिल्हा प्रभारी अधिक्षक व्ही. व्ही. वैद्य यांना चिपळूण-गुहागर मार्गावर गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने चिपळूणकडून सुरळकडे येत असलेली हुंडाई क्रेटा कार थांबविली असता त्यामध्ये गोवा राज्य बनावट मद्याचे ३६ बॉक्स आढळून आले. त्यामध्ये गोवा राज्यातील मद्य व वाहनासह रु. १४ लाख ४६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर वाहनामधील संशयीत आरोपी विपुल वसंत कांबळी (२९ , रा . पागनाका गोपाळ कृष्णवाडी ता . चिपळूण) व शुभम दयानंद चव्हाण ( २२ रा . मार्कंडी ता . चिपळूण) यांना ताब्यात घेतले व त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी सदर वाहतुकीसाठी आम्हाला अमेय चंद्रकांत बोंडकर मदत करीत असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांचा साथीदार अमेय चंद्रकांत बोंडकर (३४, रा.पागनाका ता.चिपळूण) यास ताब्यात घेण्यात आले. चिपळूण मधील या तीन आरोपींना अटक केल्याने चिपळूणमधील गोवा मद्य तस्करी करणाऱ्या मोठया रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्र.अधीक्षक वैभव व्हि. वैदय, निरीक्षक शरद जाधव, सुरेश पाटील , शंकर जाधव , दुययम निरीक्षक सुनिल सावंत, सत्यवान भगत, किरण पाटील, निखील पाटील व जवान विशाल विचारे, सागर पवार, अतुल वसावे, अर्षद शेख यांनी केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक किरण पाटील करीत आहेत.