चिपळूण:- येथील भोगळे एस.टी. बस स्थानक परिसरातून एक काळ्या रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्रो दुचाकी अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तब्बल २० दिवसांनंतर चिपळूण पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यासीन बालेचांद कोठावळे (वय २७, व्यवसाय- चष्मा दुकान, रा. परांजपे स्कीम, चिपळूण) हे गत १० मे २०२६ रोजी सायंकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास काही कामानिमित्त भोगळे एस.टी. स्टँड परिसरात आले होते. त्यांनी आपल्या वडिलांच्या नावावर असलेली काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर प्रो दुचाकी (क्र. एम.एच. १० बी.एस. ९७८६) बस स्थानक परिसरात उभी केली होती. दरम्यान, अवघ्या काही वेळातच अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय स्वतःच्या फायद्यासाठी ही ७५ हजार रुपये किमतीची दुचाकी लबाडीने चोरून नेली.
या चोरीच्या घटनेबाबत चिपळूण पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार देण्यात आली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, बस स्थानकसारख्या सार्वजनिक ठिकाणी वाहनचालकांनी आपल्या गाड्या सुरक्षितपणे लॉक करून ठेवाव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे.









