चौघांची बदली ; कामकाजावर परिणामाची शक्यता
चिपळूण:- चिपळूण पालिकेतील चार महत्वाच्या अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. त्यांच्या रिक्त जागांवर ५ ऑक्टोबरनंतर नवीन अधिकारी येण्याची शक्यता आहे; मात्र हे सर्व अधिकारी नव्याने परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेले असणार आहेत. त्यांना नगर विकास विभागातील आणि पालिकामधील कामाचा अनुभव नसल्यामुळे चिपळूण पालिकेच्या कारभारात अडचणी येण्याची शक्यता आहे.
पालिकेतील जुन्या अधिकाऱ्यांवर कामाचा ताण येण्याची शक्यता आहे. त्यांनी जर हात झटकले तर पालिकेचा कारभार मंदावण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत चिपळूण शहराच्या विकासकामांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. चिपळूण पालिकेतील आस्थापना विभागप्रमुख अनंत मोरे यांची गुहागरला बदली झाली आहे. पाणी विभागप्रमुख नागेश पेठे यांची विटा येथे बदली झाली. बांधकाम विभागाचे प्रणवल खताल हे सोलापूरला बदली होऊन गेले. संगणक विभागाच्या कांबळे यांची खेडला बदली झाली. महत्वाचे चार अधिकारी पालिकेतून बदली होऊन गेल्यानंतर हे चारही पद रिक्त आहेत. त्या ठिकाणी अजून नवीन अधिकारी आलेले नाहीत. त्या ठिकाणी चांगले अधिकारी यावेत यासाठी कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही; मात्र नगरविकास विभागाची परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेले काही अधिकारी पालिकेत ५ ऑक्टोबरनंतर येण्याची शक्यता आहे. हे सर्वच अधिकारी नवीन असणार आहेत. त्यांना त्यांच्या विभागाचे कामकाज समजून घेऊन काम करण्यासाठी काही महिन्याचा कालावधी जाईल तसेच पालिकेतील अनुभवी अधिकाऱ्यांना आपले काम सोडून त्यांना त्यांचे काम समजवावे लागणार आहे.