चिपळूण पागमळा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

चिपळूण:- शहरातील पागमळा परिसरातील दोन बंद फ्लॅट तसेच मार्कंडी भागातील तीन दुकाने चोरट्याने फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी उच्छाद मांडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी अद्याप अधिकृत तक्रार दाखल झालेली नसली तरी चिपळूण पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी संबंधित ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले असून, त्याचा बारकाईने अभ्यास सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पागमळा येथील एकाच अपार्टमेंटमधील दोन बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी रोख रक्कम लांबवली तर मार्कंडी परिसरात तीन दुकानांच्या शटरची पट्टी वाकवून चोरी करण्यात आली. दरम्यान, सीसीटीव्ही फूटेजमध्ये दोन संशयित चोरटे चोरीचा प्रयत्न करताना दिसून आले असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांकडून वेगाने हालचाली सुरू आहेत. या घटनेचा तपास चिपळूण पोलिस करत आहेत.