चिपळूण नगर परिषदेच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न; अभियंत्याच्या प्रसंगावधानाने दोन चिमुरड्यांचा वाचला जीव  

चिपळूण:- चिपळूण नगर परिषदेच्या दुसऱ्या मजल्यावरुन आज संध्याकाळच्या सुमारास उडी घेत एकाने दोन मुलांसह आत्महत्येचा प्रयत्न केला. दळवटणे येथील महेश नारायण नलावडे (४५, रा. दळवटणे, चिपळूण) असे या आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. नलावडे यांना नगर परिषदेतील अधिकारी व पोलिसांनी वाचवले.


महेश नलावडे हा सध्या चिपळूण शहरातील खेंड परिसरात राहतो. त्याला दोन लहान मुलगे आहेत. काही महिन्यांपूर्वी त्याची पत्नी व त्याच्यामध्ये वाद झाले होते. त्यामुळे ते विभक्त राहतात. शुक्रवारी दुपारी तो दोन्ही मुलांना घेऊन बाजारपेठेत आला आणि सर्वांची नजर चुकवत थेट चिपळूण नगर परिषद इमारतीवर मुलांना घेऊनच चढला.


इमारतीच्या गच्चीवर चढून त्याने प्रथम मुलांना खाली फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र नगर परिषदेचे नगर अभियंता परेश पवार यांनी चतुराईने धाव घेऊन दोन्ही मुलांना त्याच्या तावडीतून खेचून घेतले. परंतु, महेश नलावडे याने स्वतः मात्र इमारतीवरून उडी घेतली. सुदैवाने केबलचा अडथळा आला तसेच नगर परिषद कर्मचारी पोलीस व नागरिकांनी खाली ताडपत्री पकडून ठेवली होती. त्यामुळे तो थेट ताडपत्रित पडल्याने बचावला आहे. त्याला नगर परिषदेतील अधिकाऱ्यांनी तत्काळ पोलिसांच्या ताब्यात दिले.