चिपळूणात वीज कर्मचाऱ्यांना मारहाण; ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल

चिपळूण: थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या दोन कर्मचाऱ्यांना एका ग्राहकाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार काविळतळी येथे मंगळवारी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात एका ग्राहकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबतची फिर्याद वीज कर्मचारी धनवंत विठ्ठल जाधव यांनी दिली आहे. यानुसार विजय हे आपले सहकारी उमेश पांडुरंग दरवडा असे दोघेजण काविळतळी परिसरात वीज बिल वसुलीसाठी गेले होते. यावेळी  ग्राहक मोहसीन दाऊद मुकादम यांच्या सदनिकेत जाऊन थकीत वीज बिलावसंदर्भात विचारणा केली. तर यावेळी वीज पुरवठा खंडित करण्यावरून ग्राहकाला राग आला. यातून धनवंत जाधव यांना मारहाण केली. यावेळी उमेश पुढे सरसावले असता उमेश यांनाही मारहाण झाली. याप्रकरणी धनवंत जाधव यांनी ग्राहक मोहसिन यांच्याविरोधात तक्रार दिली असून मोहसिन यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास चिपळूण पोलिस करीत आहेत.