चिपळूणात एटीएम फोडून १४ लाखांची चोरी

चिपळूण:- शहरातील भोगाळे येथील भर बाजारपेठेत रहदारीच्या ठिकाणी असलेले युनियन बँकेचे एटीएम फोडून सुमारे 14 लाखांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना येथे गुरुवारी उघडकीस आली. ही घटना 31 रोजी गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पहाटे ४ वाजता घडली असल्याची माहिती पोलीस चौकशीत पुढे आली आहे. येथे एटीएम फोडल्याची घटना अनेक वर्षानंतर घडली असून एवढी मोठी रक्कम प्रथमच चोरीला गेल्याने पोलीस यंत्रणेसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

 शहरातील चिंचनाका ते मध्यवर्ती बस स्थानकादरम्यान असलेल्या भोगाळे परिसरात युनियन बँकेचे उपशाखा आहे. या शाखेच्या तळमजल्यावर हे एटीएम आहे. या एटीएममध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ३० रोजी पुरेशी रक्कम ठेवण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ३१ रोजी गणेशोत्सवानिमित्त सुट्टी असल्याने या दिवशी ग्राहकांना कमी पडू नये या उद्देशाने अधिक रक्कम ठेवण्यात आली होती. मात्र गुरुवारी बँकेच्या अधिकाऱ्यांनी एटीएमची केली असता चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. त्यानंतर तातडीने पोलिसांना खबर देण्यात आली. 

या घटनेची गंभीरपणे दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ एटीएम तपासणी करून ते सील केले. त्यानंतर ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. तसेच या परिसरातील फुटेज ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यानुसार या चोरीचा तपास करण्यासाठी खास पथक तयार करण्यात आले आहे.