चिपळूण:-तालुक्यातील पाग गोपाळकृष्णवाडी येथील सुखाई देवी मंदिरात १० मार्च २०२२ रोजी रात्रीच्या सुमारास शिमगा उत्सवाची मिटींग चालू असताना पालखी घरी नेण्याच्या कारणावरुन यातील आरोपी दिलीप पांडुरंग भोजने व शशिकांत पांडुरंग भोजने यांनी फिर्यादी संतोष महादेव भोजने यांना धारदार चाकूसारख्या हत्याराने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पोटाच्या खाली मारून गंभीर दुखापत केली म्हणून चिपळूण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना अटक करून चिपळूण न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. या गुन्ह्यातील आरोपी शशिकांत भोजने यांना या पूर्वीच जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. आरोपी नंबर १ दिलीप पांडुरंग भोजने यांचा जामीन अर्ज देखील जिल्हा व सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे.