चिपळूण:- चिपळूण येथील बहादूरशेख नाका परिसरात वाहतूक नियमनाचे कर्तव्य बजावत असताना पोलिसांनी एका संशयित तरुणाला मोटारसायकलसह ताब्यात घेतले आहे.
मोटारसायकलच्या मालकीबाबत समाधानकारक उत्तर देऊ न शकल्याने बिहारमधील या तरुणावर महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास बहादूरशेख येथे कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर बहादूरशेख नाका ते कराडकडे जाणाऱ्या मार्गावर चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल शैलेश शांताराम वनगे हे वाहतूक नियमनाचे काम करत होते. यावेळी त्यांना राजाकुमार दिनेश मंडल (वय २०, रा. सुखवासी, जि. मधुबनी, राज्य बिहार) हा तरुण एम. एच ०८ बी.जे ०८४७ या क्रमांकाच्या मोटारसायकलसह संशयास्पद रित्या आढळून आला.
पोलिसांनी त्याला थांबवून सदर वाहनाबाबत विचारपूस केली असता, त्याला या गाडीच्या मालकी हक्काबाबत कोणतीही कागदपत्रे दाखवता आली नाहीत किंवा समाधानकारक उत्तर देता आले नाही.
सदर मोटारसायकल ही चोरीची असण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी ती जप्त केली असून आरोपी राजाकुमार मंडल याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची नोंद ५ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजून १ मिनिटाने चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.









