चिपळूणमध्ये मोठी आग दुर्घटना थोडक्यात टळली

दहा खाजगी बसेस जळून खाक होण्यापासून वाचल्या

चिपळूण:- चिपळूण शहरात काल रात्री मोठी आग दुर्घटना घडण्याची शक्यता असताना, वेळेवर करण्यात आलेल्या तत्पर कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला. दहा खाजगी ट्रॅव्हल्स बसेस जळून खाक होता होता वाचल्या.

शुक्रवारी रात्री सुमारे बाराच्या सुमारास चिपळूण मध्यवर्ती बस स्थानकासमोरील अरिहंत कॉम्प्लेक्सच्या शेजारी असलेल्या गवत व कचऱ्याला अचानक आग लागली. काही क्षणांतच या आगीने रौद्ररूप धारण केले.

अरिहंत कॉम्प्लेक्समध्ये वास्तव्यास असलेले अ‍ॅडव्होकेट चिन्मय दीक्षित यांनी प्रसंगावधान राखत तातडीने ही बाब खाजगी बस चालक मंदार लाड यांना कळवली. यानंतर मंदार लाड त्वरित घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्याशी संपर्क साधण्यात आला. माहिती मिळताच त्यांनी तत्काळ नगरपालिकेचा अग्निशामक बंब घटनास्थळी पाठवला आणि स्वतःही आगीच्या ठिकाणी दाखल झाले. आग भडकत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून रात्री एक वाजेपर्यंत पाणी मारण्यात आले.

या ठिकाणी दहा ट्रॅव्हल्स बसेस उभ्या होत्या, ज्या चिपळूण–रत्नागिरी मार्गावर प्रवास करतात. चिपळूण नगरपालिकेचे पार्किंग याच परिसरात असले तरी तेथे सुरू असलेल्या कामामुळे ठेकेदाराने कुलूप लावले असल्याने या बसेस रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात आल्या होत्या.

मंदार लाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसंगावधान राखत आपापल्या गाड्या तातडीने बाजूला काढल्या. मात्र काही बसेसना आगीची झळ बसली असून काही गाड्यांचे लाईट्स वितळले, तर काहींच्या काचा फुटल्या.

नगराध्यक्ष उमेश सकपाळ, मंदार लाड व अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आली. अन्यथा दहा बसेस जळून खाक होण्यासोबतच अरिहंत कॉम्प्लेक्स या इमारतीला देखील मोठा धोका निर्माण झाला असता.

वेळीच करण्यात आलेल्या कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.