१० ते १५ बँक कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
चिपळूण:- चिपळूण येथील बहादूरशेख नाका परिसरात असलेल्या ‘चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थे’च्या मुख्य कार्यालयासमोर मंगळवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. पतसंस्थेच्या कथित गैरकारभाराविरुद्ध उपोषणास बसलेल्या कार्यकर्त्याचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला १० ते १५ कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून परिसरात खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी येथील ‘दूरदर्शन’चे अधिकृत पत्रकार दीपक दिलीप भागवत (वय ४०) हे त्यांचे कॅमेरामन रूपेश साळुंखे यांच्यासह बातमीच्या कव्हरेजसाठी चिपळूणला आले होते. सामाजिक कार्यकर्ते स्पेश सुरेश पवार हे चिपळूण नागरी पतसंस्थेच्या कारभाराविरोधात उपोषणाला बसणार होते. उपोषणस्थळी पतसंस्थेचे कर्मचारी आणि पवार यांच्यात बाचाबाची सुरू असताना, पवार यांनी पत्रकारांना तिथे बोलावले. दीपक भागवत हे आपला ‘बूम आयडी’ घेऊन आणि कॅमेरामन शूटिंग करत असताना, पतसंस्थेच्या १० ते १५ कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर धावून येत “तू कसला पत्रकार, कशाचे शूटिंग करतोय?” असे म्हणत बेकायदेशीर जमाव जमवला.
या जमावाने पत्रकार भागवत यांना धक्काबुक्की करत लाथाबुक्क्यांनी व हाताने बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर, त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. या गोंधळात आरोपींनी भागवत यांची साईड बॅग, प्रेस आयडी आणि बॅगेतील इतर साहित्य बळजबरीने चोरून नेले.
या गंभीर घटनेनंतर दीपक भागवत यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या विविध कलमांसह ‘महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था अधिनियम २०१७’ च्या कलम ४, भारतीय न्यायसंहिता कलम १८९(२), १९०, १९१(२), ३०३(२), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेचा पत्रकार संघटनांकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात असून, आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे.









