तिघांविरोधात गुन्हा दाखल
चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील मार्ग ताम्हणे सुतारवाडी येथील एका घरात घरफोडी करून तब्बल 3 लाख 98 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तीन महिलांविरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गजानन आत्माराम कोतावडेकर (वय 63, रा. मार्ग ताम्हणे सुतारवाडी) यांच्या घरात 24 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते 26 जुलै 2025 रोजी सकाळी 9.30 या कालावधीत अज्ञात आरोपींनी प्रवेश केला. या आरोपींनी घरातील बेडरूममध्ये ठेवलेले लोखंडी कपाट उघडून त्यातील सोन्याचे दागिने लंपास केले.
चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये सोन्याचे मंगळसूत्र, चैन, कानातील साखऱ्या, सोन्याचा हार आदींचा समावेश आहे. चोरी झालेल्या दागिन्यांची एकूण किंमत ₹3,98,000 इतकी आहे.
या प्रकरणात पूजा मोहन घोलप (वय 50), सायली तुषार पांचाळ (वय 30) – दोघी रा. जुना एस.टी. स्टँड मागे, रत्नागिरी, तसेच इतर अज्ञात व्यक्तींविरोधात 1 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 7 वाजून 11 मिनिटांनी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिपळूण पोलीस अधिक तपास करीत आहेत.