चिपळूणमध्ये गोवा बनावटीचा साडेपाच लाखांचा मद्यसाठा जप्त

चिपळूण:- राज्य उत्पादन शुल्क विभागाने चिपळूण तालुक्यातील वालोपे येथे गोवा निर्मित मद्याचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत ५ लाख ६७ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

श्रीमती किर्ती शेडगे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे चिपळूण तालुक्यातील वालोपे येथील तांबीटकरवाडी येथे मोहन लक्ष्मण तांबीटकर यांच्या घरातील पडवीत बेकायदेशीररित्या साठवलेल्या मद्याचा साठा आढळून आला.
या कारवाईत महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या आणि केवळ गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या एकूण ६३ बॉक्स (५५६.९२ ब.लि.) मद्य जप्त करण्यात आले, ज्याची किंमत ५,६७,८४० रुपये आहे. या प्रकरणी गुन्हा क्रमांक १५०/२०२५ नुसार प्रवीण गणपत तांबीटकर (रा. वालोपे, तांबीटकरवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या कलम ६५ (ई) आणि ९० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई श्रीमती किर्ती शेडगे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक श्री. सुनिल आरडेकर, जवान शुभम काडापुरे, निखील लोंढे, मयूर पुरीबुवा आणि वाहनचालक विशाल विचारे यांनी केली.

नागरिकांना आवाहन:
जिल्ह्यात कुठेही हातभट्टी दारूची निर्मिती, विक्री, परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक व साठा, बनावट माडी विक्री होत असल्याचे आढळल्यास, नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या व्हाट्सअप क्रमांक ८४२२००११३३ किंवा टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ वर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी विभागाने केले आहे. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवले जाईल, असेही विभागाने स्पष्ट केले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक श्री. सुनिल आरडेकर करत आहेत.