७१ वर्षीय वृद्धावर कारवाई
चिपळूण:- शहरात अवैध व्यवसायांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत चिपळूण पोलिसांनी गोवळकोट रोड परिसरात छापा टाकून एका व्यक्तीला कल्याण मटका जुगार खेळवताना रंगेहात पकडले आहे. या कारवाईत पोलिसांनी जुगाराचे साहित्य आणि रोख रकमेसह एका संशयिताला ताब्यात घेतले असून, ७१ वर्षीय वृद्धावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ९ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२:५० वाजण्याच्या सुमारास गोवळकोट कमान ते एनरॉन ब्रिज रोडवरील इकरा पार्कसमोरील मोकळ्या जागेत हा अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल शैलेश उल्हास जोगी व त्यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत संशयित आरोपी मनवरमिया राजमिया जमादार (वय ७१, रा. फिश मार्केट, आलोरे, ता. चिपळूण) हा लोकांना कल्याण मटका नावाच्या जुगाराच्या शुभ अंकावर पैसे लावून खेळ खेळवत असताना मिळून आला.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत आरोपीच्या ताब्यातून ६६० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ६६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित कलमान्वये आणि गु.आर.क्र. १४/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.









