चिपळूणमधील कोळकेवाडी – तांबडवाडीत तरुणाचा भरदिवसा खून

चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी तांबडवाडीत भरदिवसा खून झाल्याची घटना घडली आहे. रवींद्र सुर्वे याचा त्याच्या राहत्या घरी अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. रवींद्र सुर्वे याच्या डोक्याच्या मागील बाजूस लोखंडी रॉडने घाव घालून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती आलोरे येथील पोलीस पाटील यांनी तात्काळ चिपळूण पोलिसांना दिली.

हत्येच्या घटनेची माहिती मिळताच चिपळूणचे पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांनी आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी एक संशयित चौकशीसाठी ताब्यात घेण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हत्या करण्यात आलेल्या रवींद्र व त्याचा भाऊ संजय या दोघांवरही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

घटनास्थळी डॉग स्कॉड, फॉरेन्सिक लॅब टीम आदी तपास यंत्रणांना पाचारण करण्यात आलं आहे. रवींद्र विनायक सुर्वे व त्याचा भाऊ संजय असे दोघेच या घरी राहत होते. हा खून दुपारी झाला तेव्हा त्याचा भाऊ बाहेर होता. रवींद्र व संजय हे दोघेही जंगल भागात जाऊन मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवत होते. हा खून नेमका कोणी व कशासाठी केला याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

ज्याचा खून झाला त्या रवींद्र सुर्वे याची पत्नी यापूर्वीच त्याला सोडून गेली आहे. त्यामुळे घरात या दोघांव्यतिरिक्त कोणी राहत नाही, अशी प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. हत्येच्या घटनेनंतर सदर परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चिपळूणचे पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र कुमार राजमाने यांनी आलोरे पोलिसांना योग्य त्या सूचना दिल्या असून अधिक तपास करण्यात येत आहे.