बेकायदा वाळू वाहतूक करणार्‍या डंपरवर महसूल विभागाची कारवाई

चिपळूण:- वाळू उत्खननास बंदी असताना देखील म्हाप्रळ -मंडणगड ते चिपळूण अशी बेकायदा वाळूची बेकायदा वाहतूक करणारा डंपर येथील महसूल विभागाच्या पथकाने पकडला. ही कारवाई रविवारी सकाळी करण्यात आली.

वाळू उत्खननास अजुन परवानगी मिळालेली नाही. दरम्यान, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात महसूल विभागाकडून हातपाटीद्वारे वाळू उत्खननासाठी वृत्तपत्राद्वारे नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, वाळू उत्खननाचा कालावधी व रॉयल्टी यामध्ये आर्थिक दृष्ट्या परवडत नसल्याचे लक्षात आल्यानंतर वाळू व्यावसायिकांनी प्रक्रियेत सहभाग घेतला नाही. 

तर दुसरीकडे बेकायदा वाळू उत्खनन होत असल्याची ओरड झाल्यानंतर येथील  महसूल प्रशासनाने पथके तैनात केली आहेत. रविवारी सकाळी म्हाप्रळ मंडणगड ते चिपळुणच्या दिशेने वाळूची बेकायदा वाहतूक करणारा डंपर रोड परिसरात आला असता महसूल विभागाच्या पथकाने वाळू वाहतुकीचा परवाना मागितला. मात्र, या डंपर चालकाकडे कोणताही परवाना आढळून आला नाही.  यामुळे या पथकाने याची माहिती वरिष्ठांना दिला. यानंतर मंडल अधिकारी यू. आर. गिज्जेवरसह आदींनी घटनास्थळी धाव घेत कंपनीसह वाळू जप्त केली तर याचा पंचनामा करून यंदाच्या कारवाईबाबतचा अहवाल तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांच्याकडे सोपवला आहे. रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत दंड किती रुपये झाला आहे हे समजू शकले नाही. मात्र, चिपळुणात बेकायदा वाळू वाहतूक होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.