चिपळूण:- शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेत अज्ञात चोरट्यांनी एका सुपर मार्केट आणि एका प्रसिद्ध पेढीला लक्ष्य करत धाडसी चोरी केली आहे. शहर पोलीस चौकीच्या अगदी जवळ असलेल्या सुपर मार्केटमध्ये आणि मुख्य बाजारपेठेत घडलेल्या या दुहेरी चोरीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
शनिवारी मध्यरात्री ते रविवारी पहाटेच्या दरम्यान चोरट्यांनी शहर पोलीस चौकीला लागून असलेल्या एका सुपर मार्केटचे शटर तोडले. त्यानंतर त्यांनी सुपर मार्केटमधील किमती खाद्यपदार्थ आणि गल्ल्यातील रोख रक्कम लंपास केली. सुपर मार्केटमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन अज्ञात तरुण चोरी करताना कैद झाले आहेत. विशेष म्हणजे, हे सुपर मार्केट शहर पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर आहे आणि रात्री उशिरापर्यंत या परिसरात लोकांची वर्दळ असते.
याच रात्री चोरट्यांनी शहरातील सर्वात जुन्या व प्रसिद्ध असलेल्या केशव आप्पाजी ओक यांच्या पेढीलाही आपले लक्ष्य बनवले. मात्र, या पेढीतील चोरट्यांच्या हाती कोणतीही रोख रक्कम लागली नाही. परंतु, सुपर मार्केटमधील खाद्यपदार्थ आणि काही प्रमाणात रोख रक्कम घेऊन चोरटे फरार झाले.
भर दिवसा शहरातील मुख्य बाजारपेठेत आणि पोलीस चौकीच्या इतक्या जवळ घडलेल्या या चोरीच्या घटनांमुळे चिपळूण शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू झाल्याचे स्पष्ट होत आहे. एकाच रात्री मोठी पेढी आणि रस्त्यालगतचे सुपर मार्केट फोडून चोरट्यांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. या दुहेरी चोरीमुळे शहरातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस या अज्ञात चोरट्यांचा शोध कधी घेणार, याकडे लक्ष लागले आहे.