चिपळुणात डम्परच्या धडकेत महिला गंभीर जखमी

चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावर डेन्जर झोन बनलेल्या पॉवर हाऊस येथील चौकात सातत्याने अपघात घडत आहेत. या ठिकाणी अनेकांचे जीवही गेले आहेत. बुधवार दि. २३ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास एका डम्परची मोटारसायकलला धडक बसून महिला गंभीर जखमी झाली आहे.

करूणा काशिराम पालांडे असे या महिलेचे नाव आहे. पोलिस ठाण्याकडून येणारा डम्पर मुंबईच्या दिशेने वळण घेत असताना समोरून मोटारसायकलने येणाऱ्या करूणा पालांडे यांची मोटारसायकल डम्परच्या समोरील भागास मधोमध आली व त्यामध्ये त्या पडल्या. सुदैवाने त्या डम्परच्या दोन चाकांच्या मध्ये गेल्याने वाचल्या. मात्र, यामध्ये त्यांच्या पायाला दुखापत झाली. यानंतर तत्काळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले व संबंधित महिलेला रुग्णालयात हलविले. अधिक तपास पोलिस करीत आहेत.