चिपळुणातून बांधकामाचे लोखंडी साहित्य चोरीस

चिपळूण:- बांधकाम व्यवसायासाठी लागणारे ९० हजाराचे लोखंडी साहित्य अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना २ ते ४ मार्च या कालावधीत लाईफ केअर हॉस्पिटल शेजारी असणाऱ्या नासीर खोत यांच्या बिल्डींग कन्स्ट्रक्शन कार्यालयाशेजारी घडली. या प्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबतची फिर्याद जावेद अब्दुल गणी पोशरकर यांनी दिली. या लोखंडी साहित्यात ६ हजार किमतीचे १०५ किलो वजनाच्या लोखंडी सळ्या, ३ हजार रूपये किमतीच्या ५० किलो वजनाच्या कॉलमसाठी लागणाऱ्या लोखंडी चौकोनी रिंग असे ९० हजार रूपये किंमतीच्या लोखंडी साहित्याचा समावेश होता. हा चोरी प्रकार पोशरकर यांच्या लक्षात आल्यानुसार त्यांनी या प्रकरणी चिपळूण पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे.