पाहणीनंतर रेल्वे प्रशासनाचा निष्कर्ष
रत्नागिरी:- चिंद्रवली बोगद्याच्या डोंगरावरील भेगा कोकण रेल्वे मार्गाला धोकादायक नसल्याचा निष्कर्ष रेल्वे प्रशासनाच्या प्राथमिक पाहणीनंतर काढण्यात आला आहे. सुरक्षेसाठी तेथे लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
रत्नागिरी तालुक्यातील हरचिरी-बौध्दवाडीतील डोंगर भाग खचला असून भेगाही गेल्या आहेत. तहसिल प्रशासनाकडून झालेल्या पाहणीनंतर तेथील नऊ कुटूंबांना स्थलांतराच्या नोटीसही देण्यात आल्या आहेत. या भेगा कुठपर्यंत गेल्या आहेत, याची पाहणी अधिकार्यांकडून करण्यात आली. चिंद्रवली बोगद्यावर रुळापासून २०० मीटर अंतरावर छोट्या भेगा गेल्याचे दिसून आले. याची नोंद तहसिल प्रशासनाने घेतली होती. याबाबतचा अहवालही जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आला. तहसिलदार शशिकांत जाधव यांच्या पाहणीसंदर्भातील वृत्त प्रसिध्द होताच कोकण रेल्वे प्रशासनाने तत्काळ चिंद्रवलीतील भेगांची पाहणी करण्यासाठी विशेष अधिकार्यांचे पथक पाठविण्यात आले होते. शुक्रवारी (ता. १३) अधिकार्यांनी पाहणी करून अहवालही तयार केला. सध्या भेगा किरकोळ स्वरुपात असल्यामुळे त्याचा रेल्वे रुळाला कोणताही धोका नसल्याचे त्यात नमुद केले आहे. पावसाळा संपेपर्यंत दर दोन दिवसांनी तेथील भेगांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. चिंद्रवली परिसरात भेगा पडण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षात केलेल्या विशेष उपाययोजनांमुळे कोकण रेल्वे मार्गावरील दरड कोसळण्यासह माती घसरण्याच्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यात यश आले होते. यंदाही करबुडे बोगद्यात कोसळलेली दरड वगळता अन्य मोठी घटना घडलेली नाही. करबुडेमुळे बराच काळ वाहतूक ठप्प होती. सध्या कोरोनामुळे रेल्वे गाड्यांची संख्या कमी आहे.









