चिंचघर येथे विनयभंग प्रकरणी एकास सक्तमजुरी

एक वर्ष सक्तमजुरीसह २ हजारांचा दंड

दापोली:- केळशीफाटा-चिंचघर रस्त्यावर तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी मंडणगड येथील कनिष्ठ दिवाणी न्यायालयाने संशयित आरोपीस दोषी ठरवत एक वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास दहा दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली. गणेश परशुराम चोगले (वय २३, रा. हर्णै, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे.

ही कारवाई बाणकोट सागरी पोलिस ठाण्याच्या तपासाअंती करण्यात आली. संशयित गणेश परशुराम चोगले याला भारतीय दंडसंहिता कलम ३५४ अंतर्गत दोषी ठरवण्यात आले; मात्र कलम ५०४ अंतर्गत गुन्ह्यातून त्याची निर्दोष मुक्तता झाली. संशयित आरोपीचा अटकेचा कालावधी शिक्षेच्या मुदतीत धरण्यात येणार आहे. ही घटना ३० सप्टेंबर २०२१ ला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली होती. पीडिता कामावरून घरी परतत असताना संशयित गणेश चोगले हा दुचाकी (एमएच ०८ एआर ७३०४) तिचा पाठलाग करू लागला. त्याने मैत्री कर, अशी मागणी करत मोबाईल क्रमांक विचारला. नकार दिल्यावर संशयिताने विनयभंग केला. पीडितेने बचाव करून पळ काढल्यावर आरोपीने तिला धमकावून घटनास्थळ सोडले. या प्रकरणी बाणकोट सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे एस. बी. नाईक यांनी, तर बचावपक्षातर्फे वकील आर. जे. दाबके यांनी बाजू मांडली.