चार रुग्ण सापडल्यानंतरही वरवडेत कोरोना नियमांची पायमल्ली 

रत्नागिरी:- तालुक्यातील वरवडे खारविवाडा येथे मागील दोन दिवसांत कोरोनाचे चार रुग्ण सापडले आहेत. चार रुग्ण सापडल्यानंतर देखील येथील ग्रामस्थांकडून कोरोना विषयक नियमांची पायमल्ली सुरू आहे. अवैध दारू व्यवसायाच्या ठिकाणी लोकांची झुंबड असून स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला देखील उशिराने जाग आली आहे.  

जिल्ह्यासह रत्नागिरी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यातील वरवडे खारविवाडा आणि भंडारवाडा खारविवाडा येथे मागील दोन दिवसात कोरोनाचे 4 रुग्ण मिळाले आहेत. अचानक चार रुग्ण मिळाल्याने येथील ग्रामस्थामध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र असे असताना सुद्धा अवैध दारू धंदे आणि अवैध माडी व्यवसायाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली दिसून येत आहे. ज्या भागात रुग्ण मिळाले त्या भागातील ग्रामस्थ कोरोना विषयक कोणतीही खबरदारी न घेता या ठिकाणी गर्दी करत आहेत. ग्रामकृतीदलाचे नियोजन शून्य काम आणि मुंबई वरून येणाऱ्या लोकांना वेळीच क्वारंटाईन न केल्याने गावात कोरोनाचा धोका वाढत असल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. त्याचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागण्याची भीती असून आताच प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे.