चार चाकी विकण्याच्या नावाखाली दोघांची तीन लाखांची फसवणूक

रत्नागिरी:- शहरानजीकच्या कर्ला येथे इंडियन आर्मीत नोकरीस असल्याची बतावणी करत आपल्याकडील चार चाकी वाहन विक्री करण्याच्या बहाण्याने दोन मित्रांची सुमारे 3 लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना 2 एप्रिल ते 31 ऑक्टोबर 2020 या कालावधी घडली आहे.

याप्रकरणी राजकुमार नामक संशयितावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात बरकत अली हसनमिया मजगावकर (36,रा.कर्ला उर्दू शाळेजवळ, रत्नागिरी ) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, राजकुमारने आपण इंडियन आर्मीत नोकरीला असल्याचे मजगावकर आणि त्यांच्या मित्राला सांगितले होते. या दोघांचा विश्वास संपादन करून त्या तोतयाने आपल्याकडील वाहन विक्री करण्याच्या बहाण्याने दोघांकडूनही वेळोवेळी पैसे घेतले.एकूण 3 लाख 6 हजार 760 रुपये घेऊनही पैसे किंवा वाहन न देता फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव करत आहेत.