चांदोर येथे बागेत म्हशी सोडल्याचा जाब विचारल्याच्या रागातून वृद्धाला मारहाण

रत्नागिरी:- माझ्या बागेत म्हशी सोडून माझ्या बागेचे नुकसान का करतोस असा जाब विचारल्याच्या रागातून वृध्दाला शिवीगाळ करत हातांनी तसेच लाकडी काठीने मारहाण केली. ही घटना सोमवार 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वा.सुमारास चांदोर येथे घडली आहे.

वाघु शंकर गोरे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात विष्णू लक्ष्मण बारगोडे (82,रा.चांदोर,रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, वाघू गोरे हा विष्णू बारगोडे यांच्या बागेत नेहमी आपल्या म्हशी सोडून त्यांचे नुकसान करत असतो. सोमवारी सायंकाळीही त्याने आपल्या म्हशी फिर्यादीच्या बागेत सोडल्या असता फिर्यादी विष्णू बारगोडे यांनी त्याला तू माझ्या बागेत तुझ्या म्हशी सोडून माझ्या बागेचे नुकसान करतो, का मला नेहमी त्रास देतोस असे विचारले. त्यानंतर फिर्यादी काठीने म्हशींना हाकलून लावले. या गोष्टीचा राग आल्याने संशयित वाघू गोरेने फिर्यादींना तुझ्या बापाची एकट्याची जागा आहे काय असे बोलून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर फिर्यादीला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. यात काठी तुटल्याने संशयिताने फिर्याचा हात पकडून ढकलाबुकल करुन हात व मान मुरगळली. तसेच तुला ठार मारुन टाकतो असे बोलून पुन्हा मारहाण व शिवीगाळ केली. याप्रकरणी संशयिताविरोधात भादंवि कायदा कलम 324, 323, 504,506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.