चर्मालय येथे दुचाकीस्वाराच्या मृत्युप्रकरणी डंपरचालकावर गुन्हा

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील चर्मालय नाका ते साळवी स्टॉपदरम्यान मंगळवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातप्रकरणी डंपरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओमकार संतोष सनगरे (वय १९) हे दुचाकीवरून जात असताना भरधाव वेगाने आलेल्या डंपर (क्रमांक MH-08-AP-5648) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील मयुर सुनिल घडशी (वय ४२, रा. स्वरुपानंद नगर, विमानतळ मजगांव रोड) यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर रत्नागिरी शहर पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा १९८८ अंतर्गत कलम १८४, १३४(ब)/१८७ अन्वये डंपरचालकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.