चंपक मैदान येथील अत्याचार प्रकरणाचा आठवडाभरात उलगडा

रत्नागिरी:- शहराजवळील चंपक मैदान येथे घडलेल्या आणि पोलिसात दाखल झालेल्या अत्याचार प्रकरणाचा सुरू असलेला सखोल तपास आता अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या आठवडाभरात या प्रकरणी फॉरेन्सिक लॅबचा अहवाल येताच योग्य ते सत्त्य समोर ठेवले जाईल, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

शहरानजीकच्या चंपक मैदानातील अत्याचार प्रकरणाने साऱ्या रत्नागिरीत मोठी खळबळ उडवून दिली. प्रकरणाचा अद्यापपर्यंत उलगडा झालेला नाही. मात्र आजही या प्रकरणामध्ये दडलेले गुढ काय समोर येते, याकडे साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. या घटनेनंतर उलटसुलट चर्चानाही उधाण आले होते. पण पोलिसांच्या तपासातून काय समोर येणार, याची आजही साऱ्यांनाच प्रतीक्षा लागून राहिली आहे.

चंपक मैदानावरील त्या अत्याचार प्रकरणाला सुमारे एक महिना होत आला आहे. हा प्रकार पुढे आल्यानंतर रत्नागिरीत तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. मुलींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब न्यायालयासमोर नोंदवण्यासाठीची मागणी केली होती. त्यानुसार तपास सुरू होता. राज्यभरात होत असलेल्या अत्याचार प्रकरणांमुळे या प्रकाराबाबत लवकरात लवकर उलगडा होणे आवश्यक असल्यांचे नागरिकांचे मत होते. मात्र या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. ही घटना गंभीर असल्यामुळे सगळ्या बाजूंचा विचार करणे आवश्यक आहे. या विषयीचा तपास पूर्ण होत आला आहे. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानंतर पोलीस या बाबत सविस्तर माहिती लवकरच जाहीर करतील, असे सांगण्यात आले.