चिपळूण:- शहरानजीकच्या खेर्डी शिवाजीनगर येथे बांधकाम सुरू असलेल्या घरात लपून बसलेल्या बिबट्याने वृद्धावर अचानकपणे हल्ला केला. या हल्ल्यात वृद्ध जखमी झाले असून ही घटना रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. कालांतराने बिबट्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. मात्र, बिबट्याचा मृत्यू उपासमारीने झाले असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
याबाबत वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी १ वाजता खेर्डीमधील शिवाजीनगर (वरची खेर्डी) येथील डोंगर उतारावरील रमेश बाबू वास्कर (वय ७३) यांचे मालकी जागेत घराचे बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी ते स्वतः आणि सोबत असललेले जावई विलास कृष्णा धामणस्कर व मुलगा राजेश रमेश वास्कर हे या बांधकामांवर पाणी मारण्यासाठी सकाळी ९:३० ते १०.०० चे दरम्यान गेले होते. त्याठिकाणी बिबट्या लपून बसला होता. दरम्यान, रमेश बाबू वास्कर हे तेथे जावून फळ्या उलचण्यासाठी वाकले असताना बिबट्याने अचानक हल्ला केला व त्यांना जखमी केले. त्यावेळी रमेश वास्कर यांनी आरडाओरडा केल्याने सदरचा बिबट्या तेथून पळाला. त्यानंतर रमेश वास्कर यांना पुढील उपचारासाठी त्यांच्या मुलाने बहादूरशेख चिपळूण येथील डॉ. चव्हाण यांचे दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यासाठी दाखल केले.