रत्नागिरी:- ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत गावोगावी सन 2024 पर्यंत प्रत्येक कुटुंबांना वैयक्तिक नळ कनेक्शन देण्यात येणार आहे. रत्नागिरी तालुक्यातही या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून प्रत्येक घरापर्यंत नळ कनेक्शन दिले जाणार आहे. नळकनेक्शन न दिल्यास संबधित ग्रामपंचायतीला अपात्र करण्याच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
‘जल जीवन मिशन’ योजनेंच्या अंमलबजावणीसाठी पाणीपुरवठा विभागाचा आराखडा तयार करण्यासाठी राज्याच्या अपर मुख्य सचिवांनी कालबध्द कार्यक्रम आखला आहे. त्या अनुषंगाने जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत तालुकानिहाय योजनांबाबत स्वतंत्र यादी निश्चित करण्यात आली आहे. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनची मान्यता घेतल्यानंतर 15 नोव्हेंबरपर्यंत जिह्यातील पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत योजनांची यादी सादर करून मान्यता घ्यावी. नोव्हेंबर, डिसेंबर या कालावधीत ज्या नवीन योजना पूर्ण करण्यास 3 वर्षे व 2 वर्षाचा कालावधी लागणार आहे. या योजनांचे सविस्तर प्रकल्प आराखडे तयार करावेत असे सांगण्यात आलेले आहे.
15 जानेवारी 2021 पर्यंत यादीमधील योजनांना स्वतंत्र, प्रादेशिक मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या स्तरावर तांत्रिक मान्यता घेण्यात यावी. 15 फेब्रुवारीपर्यंत प्रशासकीय मान्यता घेवून 31 मार्चपर्यंत योजनांना कार्यारंभ आदेश देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ग्रा.पं.स्तरावर 10 टक्के लोकवर्गणीची अट घालण्यात आलेली आहे. या योजनेत पत्येकाच्या घरापर्यंत नळकनेक्शन द्यावयाचे आहे. रत्नागिरी तालुक्यात अजूनही ग्रामपंचायत स्तरावर 26 हजार नळकनेक्शन देणे बाकी असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागामार्पत देण्यात आली आहे. रत्नागिरी तालुक्यातील शाळांच्या नळकनेक्शनचा आढावा देताना तालुक्यातील 317 शाळांपैकी 288 शाळांकडे नळकनेक्शन देण्यात आलेली आहेत. अजूनही 28 शाळांमध्ये नळकनेक्शन नाहीत, त्या शाळांना जलजीवन मिशन योजनेतून नळकनेक्शन देण्याची कार्यवाही केली जाणार ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता उपाध्ये यांनी सांगितले.