घरफोड्या, चोरी, दरोड्यासह वाहनचोरीतील बहुतांश मुद्देमाल मिळवण्यात पोलिसांना यश

रत्नागिरी:- जिल्ह्यातील घरफोड्या, चोरी, दरोडा, वाहनचोरी या सारख्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, गेल्या तीन वर्षांमध्ये पोलिस विभागाने यातील काही गुन्ह्यांचा छडा लावून जवळपास 45 टक्के मुद्देमाल परत मिळविला आहे. या तीन वर्षांमध्ये एकूण 1 कोटी 41 लाख 28 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेलेला आहे. त्यातील 1 कोटी 7 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल परत मिळविण्यात जिल्हा पोलिसांना यश मिळाले आहे.

घरफोडी, दरोडा या सारखे गुन्हे हे प्रामुख्याने परप्रांतीय टोळ्यांकडून केले जातात. या टोळ्या जिल्ह्यात काही वस्तूंची विक्री करण्याच्या बहाण्याने येत असतात. त्या नंतर दिवसा शहरांमध्ये फिरुन शहरातील बंद घरे आजुबाजूचा परिसर यांची रेकी करुन रात्रीच्या वेळी त्य ाठिकाणी डल्ला मारुन पळ काढतात. पोलिस विभागाकडून ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आलेेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी नागरिकांनाही आपल्या सोसायट्यांमध्ये, घराबाहेर सीसीटीव्ही बसवण्याबाबत वारंवार आवाहनही केले आहे. परंतु, नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात.

तसेच ज्या ठिकाणी सीसीटिव्ही बसवण्यात आलेेले आहेत. ते काही वेळा बंद असतात किंवा ते चांगल्या दर्जाचे नसल्यामुळे त्यातून मिळणारे फूटेज नीट तपासता येत नाही. त्यामुळेच या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण होते.