रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील १६ चोऱ्यांचा उलगडा
खेड:- गेल्या एक वर्षापासून रत्नागिरीसह रायगड जिल्ह्यातील मंदिरांतून घंटा चोरणाऱ्या राकेश तुळशीराम पडवकर (३७, लोणावळा – मावळ, पुणे) या भामट्याला येथील पोलिसांनी अखेर रविवारी गजाआड केले. त्याच्याकडून ६ लाख ५५ हजार ६०० रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला. त्याच्या अटकेने १६ चोऱ्यांचा उलगडा झाला असून पोलिसांनीही त्यादृष्टीने तपास गतिमान केला आहे.
३ ऑक्टोबर २०२५ रोजी तालुक्यातील शिरगाव खुर्द- शिवाजीनगर येथील श्री काळकाई मंदिरातून चोरट्याने पितळी घंटा, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीडीआर चोरून नेल्याची तक्रार पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली होती. या गुन्ह्याच्या तपासात तांत्रिक विश्लेषणासह गोपनीय माहितीच्या आधारे एक संशयित रायगड आणि रत्नागिरी परिसरात वावरत असल्याची बाब उघड झाली होती.
त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. जी, महामुनी, पोलीस उपविभागीय अधिकारी शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक अहिरे व पथकाने सापळा रचला. या पथकात रोहिदास केंद्रे, पोलीस कॉन्स्टेबल अजय कडू, वैभव ओहोळ, विजेंद्र सातार्डेकर, कृष्णा दराडे, शिरीष साळुंके यांचा समावेश होता. भामट्याने खेड, दाभोळ दापोली, मंडणगड, बाणकोट तर रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर हद्दीतील मंदिरातून घंटा व इतर साहित्य चोरल्याची कबुली दिली आहे.









